
म्हाडाने विक्रोळीतील घरांच्या किमती कमी केल्या तरी मुंबईतील घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत 60,556 अर्ज आले असून यातील 41,090 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. म्हाडाने मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 30 मार्च रोजी सुरुवात केली होती. घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे लॉटरीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे म्हाडाने आता अर्ज करण्यास 14 मेपर्यंत मुदतवाढ दिली. तसेच गेल्याच आठवडय़ात विक्रोळीतील 1221 घरांच्या किमती 7.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला. पण इतर घरांच्या किमती जैसे थे असल्यामुळे अर्जदारांचा लॉटरीला थंड प्रतिसाद मिळतोय. इतर घरांच्या किमतीदेखील आवाक्याबाहेर आहेत. त्याचाही म्हाडाने विचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





























































