Mumbai News – दहिसरमध्ये इमारतीला भीषण आग, गुदमरल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू तर 5 ते 6 जणांची प्रकृती चिंताजनक

दहिसरमध्ये निवासी इमारतीला भीषण आग लागून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 ते 6 जणांची प्रकती चिंताजनक आहे. शांतीनगर परिसरातील न्यू जन कल्याण इमारतीच्या सातव्या मजल्यावर रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाला आग विझवण्यास यश आले.

इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे इमारतीत सर्वत्र दूर पसरल्याने बचावकार्यात अडचण येत होती. मात्र अग्नीशमन दलाने वेळीच कारवाई करत रहिवाशांना बाहेर काढले. मात्र धुरामुळे श्वास गुदरमल्याने 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अन्य काही जणांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.