
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आयुक्तपदी आणखी तीन महिने कायम राहणार आहेत. केंद्र सरकारने बर्वे यांच्या मुदतवाढीला हिरवा कंदील दाखवला असून ते आता येत्या फेब्रुवारी महिन्यात निवृत्त होतील. 1987 च्या बॅचचे थेट आयपीएस अधिकारी असलेले संजय बर्वे हे 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले होते, मात्र त्या वेळी राज्य सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्या मुदतवाढीचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपणार असल्याने ते याच दिवशी निवृत्त होणार होते, परंतु संजय बर्वे यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी असा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला होकार देऊन केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार संजय बर्वे हे येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कायम राहणार आहेत.


























































