
सामना प्रतिनिधी। मुंबई
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरूच आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्याने पक्षाचे जहाज भरकटले असतानाच राज्य पातळीवरही एकापाठोपाठ एक नेते खुर्ची सोडू लागले आहेत. रविवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पदत्याग करून पक्षातील अस्वस्थतेत आणखी भर टाकली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात राजीनाम्याची जणू सुनामीच आली आहे. विविध राज्यांतील वरिष्ठ नेते पदावरून पायउतार झाले. यात रविवारी मिलिंद देवरा आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची भर पडली.
मुंबई काँग्रेसचा कारभार तिघांच्या समितीला हाकू द्या!
देवरा यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसचा वाली कोण? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होण्याआधीच देवरा यांनी यावर पक्षाला उपाय सुचविला आहे. मुंबई काँग्रेसचा कारभार तीन सदस्यांच्या समितीला हाकू द्या, पक्षाला सावरण्यासाठी मला राष्ट्रीय पातळीवर काम करायचेय, असे ते म्हणाले.
पक्षाध्यक्षपदासाठी नाव सापडेना!
अनेक नेत्यांनी हात जोडून विनंती केल्यानंतरही पक्षाध्यक्षपद सोडलेल्या राहुल गांधी यांच्या जागी नवे नाव शोधणे मुश्किल बनले आहे. 14 आमदारांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटक काँग्रेसला सुरुंग लागल्यानंतर रविवारी नवी दिल्लीत बैठक घेण्यात आली होती. यावेळी पक्षाध्यक्षपदाचाही मुद्दा पुढे आला, परंतु राहुल यांचा उत्तराधिकारी शोधण्यात अपयशच आले. दरम्यान, काँग्रेस कार्यकारी समिती निर्णय घेईपर्यंत राहुल गांधी हेच पक्षाध्यक्ष राहतील, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांगितले.































































