
गुजरातमध्ये भाडेतत्त्वावर एक घर घेऊन तेथे एमडी बनवून त्याची देशभरात विक्री करणाऱ्या ड्रग्ज माफियांचा धंदा साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 74 कोटी 97 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
साकीनाका पोलिसांनी 21 मे रोजी अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर मुस्कान खान (26) या ओला-उबेर चालक असलेल्या महिलेला 101 ग्रॅम एमडीसह रंगेहाथ पकडले होते. तिच्या चौकशीत तिने हा एमडी वझुल कमर अबुल वळा चौधरी ऊर्फ पप्पू (56) यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा येथील कौसा परिसरात राहणाऱया वझुल याला शिळफाटा येथे पकडले. वझुलला ताब्यात घेतल्यानंतर ड्रग्जच्या गोरखधंद्याचा भंडाफोड झाला.
भाड्याच्या घरात…
वझुल याच्या चौकशीत गंभीर बाब समोर आली. त्याच्या गुजरात येथील वरखड गावातील एका ओळखीच्या व्यक्तीचे घर भाड्याने घेऊन तेथे तो स्वतः एमडी बनवत होता. ही बाब समोर येताच साकीनाका पोलिसांनी वरखडमधील त्या घरावर छापा टाकला. तेव्हा तेथे 20.141 किलो एमडीसह एकूण 74 कोटी 97 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले.






























































