‘देहव्यापार करणे कायद्याने गुन्हा नाही, महिलांना त्यांचा व्यवसाय निवडण्याचा अधिकार’, मुंबई उच्च न्यायालय

देहव्यापाऱ्यात सामील असलेल्या तीन महिलांच्या संबंधित एका खटल्यावर सुनावणी करत असताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. गुरुवारी यासंदर्भातील खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने या तीन महिलांना दोषमुक्त करत म्हटले आहे की, देहव्यापार करणे हे कायद्यांनुसार गुन्हा नाही. तसेच महिलांना आपला व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती पृथ्वीराज चौहान म्हणाले, ‘Immoral Traffic (Prevention) Act (PITA), 1956 देहव्यापार संपवणारा नाही. कायद्याच्या अंतर्गत अशी कोणतीही तरतूद नाही, जी देहव्यापार गुन्हा असल्याचे सांगते. तसेच त्यात सहभागी असलेल्या कोणालाही शिक्षा करण्याचा अधिकार देते.’ न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, एखाद्या व्यक्तीला व्यावसायिक गरजांसाठी त्रास देणे या कायद्यानुसार गुन्हेगारीच्या श्रेणीत येते आणि त्यास शिक्षेची तरतूद आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर न्यायालयाने या तिन्ही महिलांना सन्मानपूर्वक दोषमुक्त केले आहे. दरम्यान, या महिलांना वसतिगृहातून अटक करण्यात आली होती. या तिन्ही महिला देहविक्रीचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या