
सामना प्रतिनिधी। मुंबई
शीव-धारावी मार्गावर होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी लवकरच दूर होणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते पूर्व द्रुतगती उन्नत मार्गासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 100 जणांच्या टीमने गेली तीन दिवस रोज पहाटे काम करून सहा गर्डर्स यशस्वीरीत्या उभारले. त्यामुळे हा उन्नत मार्ग जुलैअखेरीपर्यंत खुला होऊन वाहतुकीच्या कोंडीमुळे वाया जाणारा अर्ध्या तासाचा प्रवास वाचणार आहे.
21 इंजिनीअर्स, रेल्वेचे दोन अधिकारी आणि 80 कामगारांच्या टीमने हे 80 टनाचे आणि 53 मीटर लांबीचे सहा गर्डर्स उभारण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले. त्यामुळे मिठी नदीवरील पूल, शीव स्थानकाजवळील रेल्वे ट्रक ओलांडणारा पूल आणि चुनाभट्टी रेल्वे मार्गावरचा पूल बांधण्यास एमएमआरडीएला मदत होणार आहे. 155 कोटी रुपये खर्चून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते पूर्व द्रुतगती महामार्ग असा उन्नत मार्ग बांधण्यात येत आहे. या मार्गामुळे प्रवास तीन किलोमीटरने कमी होणार आहे.

























































