
सामना प्रतिनिधी। मुंबई
मे महिन्यात आंबा, काजू- रतांब्याची मजा लुटून कोकणातून मुंबईत येणाऱया चाकरमान्यांची सध्या शीव हायवेवर टॅक्सी-रिक्षावाल्यांकडून खुलेआम प्रचंड लूट सुरू आहे. कोकणातून खासगी लक्झरी बसने शीव हायवेच्या स्टॉपवर उतरल्यावर पुन्हा घरी जाण्यासाठी चाकरमान्यांना टॅक्सी- रिक्षातून घरी सोडण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या डोळय़ांदेखत अवाच्या सवा भाडे आकारण्याचा प्रकार सुरू आहे. आता उन्हाळी सुट्टी संपवून चाकरमानी मोठय़ा संख्येने पुढील काही दिवसांत मुंबईत येतील तेव्हा शीव हायवेवर उतरणाऱया प्रवाशांच्या हालांमध्ये अधिकच भर पडणार आहे.
मे महिन्याच्या सुट्टीत जाण्यासाठी चाकरमान्यांना कोकण रेल्वेचे तिकीट मिळवण्यापासून झगडावे लागते. तिकीट मिळाले तरी कोकणात जाताना डब्यातील घुसखोरीमुळे मारामाऱया, भांडणे होतात. सुट्टी संपवून पुन्हा मुंबईत घरी जाण्यासाठी कोकण रेल्वेचे तिकीट नसले तर मग चाकरमान्यांना जादा पैसे मोजून खासगी लक्झरी बसशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे कोकणातून खासगी बसने ते मुंबईत येतात. दररोज सकाळी कोकणातून असंख्य बस चाकरमान्यांनी भरून मुंबईत येतात, पण मुंबईत आल्यावर चेंबूर, शीवला उतरणाऱया प्रवाशांची टॅक्सी-रिक्षावाल्यांकडून खुलेआम लूट सुरू होते.
परदेशी पर्यटकाची फसवणूक
गोव्यातून येणाऱया परदेशी पर्यटकांना तर टॅक्सीचालक फसवतात. गोव्यावरून आलेल्या तीन-चार परदेशी पर्यटकांना कुलाब्याला जायचे होते. टॅक्सीवाल्यांनी त्यांना थेट एक हजार रुपये भाडे सांगितले. परदेशी पर्यटकांना टॅक्सीच्या दरांची कल्पना नसल्याने ते फसतात.
पोलिसांची डोळेझाक
शीवच्या हायवे अपार्टमेंटच्या बाहेर झाडाच्या सावलीत वाहतूक पोलीस उभे असतात, पण प्रवाशांच्या होणाऱया लुटमारीकडे पोलीस दुर्लक्ष करतात. मात्र नो पार्किंगच्या नावाखाली टॅक्सीवाल्यांना दोनशे रुपये दंड आकारतात, पण प्रवाशांची होणारी लुटमार डोळय़ांदेखत बघूनही कारवाई करीत नाहीत. दादर स्थानकाच्या बाहेर ज्याप्रमाणे रांगा लावून टॅक्सीवाले प्रवासी भाडे घेतात तशीच व्यवस्था या ठिकाणी करत नाहीत, असा प्रश्न एका वाहतूक पोलिसाला केला. त्यावर इकडे काय टॅक्सीच्या रांगा लावणार, असा प्रतिप्रश्न एका पोलिसाने केला.
टॅक्सीचालकांची मक्तेदारी
शीवच्या हायवे अपार्टमेंटच्या बाहेर चार-पाच जुन्या टॅक्सीचालकांची भयंकर दादागिरी सुरू असते. इतर टॅक्सीवाले त्यांच्या दादागिरीला घाबरतात. जुन्या टॅक्सीवाल्यांना जोपर्यंत मोठे प्रवासी भाडे मिळत नाही तोपर्यंत हे टॅक्सीवाले जागेवरून हटत नाहीत.
रिक्षाचालकांकडूनही लूट
शीववरून पश्चिम आणि पूर्व उपनगरात जाण्यासाठी टॅक्सी परवडत नसल्याने अनेक चाकरमानी रिक्षाने घरी जाण्याचा निर्णय घेतात, पण रिक्षाचालकही लुटमार करतात. देवगडचे परब आडनावाचे गृहस्थ गावाहून येताना भरपूर सामान घेऊन लक्झरी बसमधून उतरले. त्यांना बोरिवलीच्या दत्तपाडा भागात जायचे होते. रिक्षावाल्याने सामानासह तीनशे रुपये भाडे द्यावे लागेल असे सांगताच परब यांना धक्काच बसला. त्यांनी दुसऱया एका रिक्षावाल्याला विचारले तेव्हा अडीचशे रुपये लागतीत असे सांगितले. मग एक रिक्षाचालक दीडशे रुपये लागतील असे सांगू लागला. परब यांना हे दर परवडत नव्हते. ते अतिशय हतबल झाले. अखेर देवदूतासारखा एक रिक्षावाला आला आणि मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे आश्वासन देताच परब रिक्षात बसले आणि घरी रवाना झाले
मनमानीपणे भाडे आकारणी
मुंबई शहरात वाहतूककोंडी होते म्हणून हल्ली खासगी लक्झरी बसना दादर टी.टी. पर्यंत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे प्रवाशांना शीव हायवेवर हायवे अपार्टमेंटच्या बाहेर उतरावे लागते. गोवा व कोकणातून लक्झरी बस आल्यावर प्रवाशांना टॅक्सीचालक घेरून टाकतात. प्रवासी भाडे मिळवण्यासाठी अनेकदा टॅक्सीचालकांमध्येच भांडणे होतात. पण दूरवरचे प्रवासी भाडे असले तरच टॅक्सीवाले होकार देतात. दादर, माहीम, वडाळा, परळ, लालबाग अशा जवळच्या भागात टॅक्सीचालक येण्यास तयार होत नाही. मीटर टॅक्सी असूनही प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारतात. सामानासह आठशे-एक हजार रुपये लागतील. परवडत असेल तर टॅक्सीने चला अशा शब्दांत टॅक्सीचालकांची दादागिरी सुरू असते.





























































