
अतुल कांबळे । मुंबई
मुंबई उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्यांना आता सहा डबे एसीचे आणि सहा डबे साधे अशा मिक्स लोकलने प्रवास करायला मिळणार आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता २४ एसी लोकल मुंबईला मिळणार आहेत. त्यातच काही लोकल मध्य रेल्वेलाही मिळणार असल्याने मुंबईकरांचा लोकल प्रवास खऱया अर्थाने गारेगार होणार आहे.
बम्बार्डिअर किंवा सिमेन्सला मिळणार टेंडर
प्रत्येकी १२ डब्यांच्या या लोकलची सहा-सहा डब्यांत विभागणी होणार असून सहा डबे एसीचे तर सहा डबे साधे बम्बार्डिअरचे किंवा सिमेन्सचे अशा मिक्स २४ लोकल तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी बम्बार्डिअर किंवा सिमेन्स कंपनीला टेंडर देण्यात येणार आहे. नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात या लोकल एकामागोमाग येण्यास सुरुवात होणार असून मध्य रेल्वेलाही काही लोकल मिळणार असल्या तरी त्यांची नेमकी संख्या अद्याप ठरली नसल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी सांगितले.
एसी लोकलच्या वार्षिक पासावर विचार सुरू
पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलचे सध्याचे फर्स्ट क्लासच्या १.२ पट असलेले भाडे डिसेंबरपर्यंत कायम राहणार असले तरी तिचा मासिक पासच मिळत आहे. साध्या लोकलप्रमाणे तिचाही त्रैमासिक आणि वार्षिक पास मिळावा अशी प्रवाशांची मागणी आहे. त्यावर विचार सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी सांगितले.





















































