
मेट्रो प्रकल्पाला अडथळा ठरणाऱया झाडांचे पुनर्रोपण व काही झाडे तोडण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने घेतला आहे. प्राधिकरण समितीच्या निर्णयाला आक्षेप घेत या कामास स्थगिती द्यावी अशी मागणी करत एका संस्थेने हायकोर्टाकडे केली आहे. आज हायकोर्टात सुनावणीवेळी याचिकाकर्त्याना दिलासा देण्यास नकार देत खंडपीठाने संस्थेची मागणी फेटाळली. त्यामुळे वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 च्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 प्रकल्पाचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. त्यासाठी ठाण्यातील सुमारे 500 झाडे पुनर्रोपित व तोडण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरण समितीने दिली आहे. मात्र मेट्रोचे काम एलिव्हेटरऐवजी भुयारी करण्यात यावे व वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी करत ठाणे नागरिक प्रतिष्ठानच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेवर न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. एमएमआरडीएच्या वतीने ऍड. मिलिंद साठे यांनी बाजू मांडली. त्यांनी याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करू नये. त्यामुळे एमएमआरडीएचे नुकसान होईल व सार्वजनिक हिताच्या प्रकल्पावर परिणाम होईल असे खंडपीठासमोर सांगितले. हायकोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत याचिका फेटाळली.






























































