बेफाम वाहनांना रोखणार ‘वायुवेग’, 76 वाहने सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मद्यपान करून वायुवेगाने वाहने चालवण्याची बेफिकीर वृत्ती, त्यातून होणारे जीवघेणे अपघात, मोटारींना काळ्या काचा लावून फिरणारे तथाकथित कार्यकर्ते अशांना रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या परिवहन विभागाच्या 92 वायुवेग पथकांच्या ताफ्यात आता 76 वाहने तैनात करण्यात येणार आहेत. त्या वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल.

वेगापायी प्राण जातात

कारण नसताना उगाचच वेगापायी वाहनचालक आणि सोबतींचेही प्राण जातात. अनेकदा वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. ही प्राणहानी न होता त्यांना वाचवणे हेच शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी किंवा अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आधुनिक इंटरसेप्टर वाहने

राज्यामध्ये वाहन तपासणीसाठी परिवहन विभागाची एकूण 92 वायुवेग पथके आहेत. राज्य रस्ता सुरक्षा निधीतून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ एस फाईव्ह या मॉडेलची 76 वाहने खरेदी केली आहेत. वेगमर्यादा ओलांडणाऱया वाहनांना रोखण्यासाठी त्यात स्पीड गनबरोबर ब्रेथ अॅनालायझर, टींट मीटर उपकरणे, इंटिग्रेटेड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वेगवान धावणाऱया वाहनांच्या अपघातात बळी जाणाऱयांची संख्या हजारात आहे. नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. ते रोखण्यासाठी ही सुसज्ज वाहने दाखल झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील, अपर मुख्य परिवहन सचिव आशिषकुमार सिंह, आयुक्त अविनाश ढाकणे उपस्थित होते.