
मुंबई विद्यापीठाने सोमवारी सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र यानुसार तरी सिनेट निवडणुका पार पडतील का? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. विद्यापीठाने सिनेट निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून निवडणूक कार्यक्रमाच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेदेखील म्हटले आहे. प्रत्यक्ष सिनेट निवडणूक पुढील वर्षी एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. 21 एप्रिलला निवडणूक आणि 24 एप्रिलला मतमोजणी होणार असून नव्याने घाट घातलेल्या मतदार नोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे.
30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान नव्याने मतदार नोंदणी होणार आहे. नव्या मतदार नोंदणी सुरू होत असताना याआधी मतदार नोंदणी शुल्क भरलेले असल्यास पुन्हा मतदार नोंदणी शुल्क भरण्याची गरज नाही. याआधी जर मतदारांनी नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी या लॉगिन आयडीद्वारे अर्ज केले असतील त्याच लॉगिन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करू शकतील, असेही विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
सुधारित सिनेट निवडणूक वेळापत्रक
- 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023- नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी अर्ज भरणे.
- 1 डिसेंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2024- नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व तात्पुरती मतदार यादी प्रसिद्धी
- 26 फेब्रुवारी 2024 – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
- 29 फेब्रुवारी 2024 – निवडणूक अधिसूचना जाहीर
- 11 मार्च 2024 – उमेदवारी अर्ज स्वीकारणे
- 13 मार्च 2024 – उमेदवारी अर्ज छाननी
- 15 मार्च 2024 – अर्ज वैधतेबाबत कुलगुरू अपील करणे
- 18 मार्च 2024 – अर्ज मागे घेणे
- 20 मार्च – उमेदवारांची यादी प्रसिद्ध
- 21 एप्रिल 2024 – सिनेट निवडणूक (सकाळी 9 ते सायंकाळी 5)
- 24 एप्रिल 2024 – मतमोजणी
तब्बल 16 महिन्यांपासून विद्यापीठात विद्यार्थी प्रतिनिधी नाही
मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर निवडणुकीत आपल्या विद्यार्थी संघटनेचा एकही उमेदवार निवडून येणार नाही याची शाश्वती असलेले मिंधे सरकार आणि मुंबई विद्यापीठाने पदवीधर सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मध्यरात्री जाहीर केला. विद्यापीठ आणि सरकारचे साटेलोटे या निवडणूक कार्यक्रमातून उजेडात आल्याने यावर विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मतदार याद्यांत कोणत्याही चुका नसल्याचे त्यासाठी नेमलेल्या समितीने जाहीर करूनही पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करण्याचा घाट घालत पदवीधर सिनेट निवडणुका या जाणीवपूर्वक एप्रिल महिन्यापर्यंत खेचून नेण्यात आल्या आहेत. यादरम्यानच्या तब्बल 16 महिन्यांहून अधिक कालावधीत विद्यापीठात पदवीधर सिनेटच नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाली कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


























































