प्रत्येक महाविद्यालयाने दीडपट मूल्यांकन करावे! मुंबई विद्यापीठाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील 2019च्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या उन्हाळी परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने दीडपट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करावे, असा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. दीडपट मूल्यांकन झाल्याचे प्रमाणपत्र परीक्षा विभाग देणार आहे. हे प्रमाणपत्र विद्यापीठात विविध प्रस्ताव सादर करताना आवश्यक राहणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आणि विद्यापीठ अधिनियमानुसार कोणत्याही परीक्षेचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करणे विद्यापीठांना बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाने परीक्षेसाठी तपासलेल्या उत्तरपुस्तिका आणि प्राध्यापकांची संख्या याबाबत उपकुलसचिव, केंद्रीय मूल्यांकन कक्ष, परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ यांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र हे संलग्नता, नियमितता, नैसर्गिक वाढ, प्रवेशक्षमता, पदव्युत्तर केंद्र/संशोधन केंद्र तसेच विद्यार्थ्यांची नोंदणी याबाबत विद्यापीठाला प्रस्ताव सादर करताना आवश्यक राहणार आहे. याबाबतची माहिती पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि ठाण्यातील प्राचार्यांच्या बैठका घेऊन देण्यात आली आहे.