
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार तीन गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी केली नाही अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध व्हावी यासाठी आजपासून मुंबई विद्यापीठाची वेबसाईट पुन्हा सुरू होणार आहे.
मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमवर्ष प्रवेशासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार 6 ते 10 जून 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांना https://mu.ac.in/admission या लिंकवर प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. या कालावधीत प्राप्त झालेले प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीचे अर्ज आणि आधीचे प्राप्त झालेले प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीचे अर्ज यांची एकत्रित यादी तयार करून गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अश्या अनुषंगाचे परिपत्रक मुंबई विद्यापीठातर्फे निर्गमित करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 6 ते 10 जून (दुपारी 1.00 वाजेपर्यंत) प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करता येईल. 11 जून रोजी सकाळी 11 वाजता चौथी गुणवत्ता यादी जाहीर होईल. तर पाचवी गुणवत्ता यादी 14 जून रोजी दुपारी 12 वाजता जाहीर होणार आहे.