मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात संघर्ष क्रीडा मंडळाने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी महात्मा गांधी स्पोर्टस् क्लबचा चुरशीच्या लढतीत 30-28 असा पराभव करीत सलग तिसऱया वर्षी या विजेतेपदावर आपले नाव कोरले. पण कुमारी गटात मात्र त्यांना याच महात्मा गांधी स्पोर्टस्ने संघर्ष क्रीडा मंडळावर 37-12 असा सरळ विजय मिळवला. यामुळे दोन्ही संघांना संमिश्र विजेतेपदावर समाधान मानावे लागले.
नेहरूनगर-कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळाने पहिल्या डावातील 12-17 अशा पिछाडीवरून 2 गुणांनी बाजी पलटविली व हॅटट्रिक साजरी केली. सायली जाधव, तेजस्विनी पाटेकर यांनी चतुरस्र खेळ करीत महात्मा गांधीला 5 गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पण ती राखण्यास त्यांना अपयश आले. संघर्षच्या कोमल देवकर, पूजा जाधव यांनी आपला खेळ उंचावत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पण हे सातत्य त्यांना कुमारी गटात राखता आले नाही. कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधीने संघर्षवर 37-12 असा सरळ पाडाव करीत महिला गटातील पराभवाचा वचपा काढला.





























































