भीषण परिस्थिती! मुंबईकरांच्या श्वासात विषारी धूर, कर्करोगाशी संबंधित धूलिकण धोकादायक पातळीवर ‘सीआरईए’ संस्थेच्या अहवालातील निष्कर्ष

मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. शहराच्या हवेत कर्करोगाशी संबंधित धूलिकण धोकादायक पातळीवर पोहचले आहेत. मुंबईकरांच्या श्वासावाटे विषारी धूर शरीरात जात असून त्याने कर्करोगाचा धोका वाढला आहे. चेन्नई, कोलकातापेक्षा मुंबईत भयानक प्रदूषण आहे. देवनार, शीव, कांदिवली पूर्व आणि बीकेसी या भागांची प्रचंड घुसमट होत आहे. ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅण्ड क्लीन एअर’(सीआरईए) या संस्थेच्या अहवालातून हे भीषण वास्तव उजेडात आले आहे.

शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले, मात्र प्रशासन त्यात अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे. ‘सीआरईए’ संस्थेने देशभरात 239 शहरांतील सहा महिन्यांतील हवेची गुणवत्ता तपासून अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, मुंबईच्या हवेतील पीएम 2.5 या विषारी कणांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय मानकांपेक्षा कमी आहे. शीव, देवनार आदी भागांतील हवा चेन्नई, कोलकाता, पद्दुचेरी व विजयवाडा आदी शहरांपेक्षा जास्त प्रदूषित आहे. मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरात उच्च प्रदूषित क्षेत्र असणे हे धोक्याचे संकेत आहेत.

प्रदूषणाचे हॉटस्पॉट

देवनार, शीव, कांदिवली पूर्व, वांद्रे-कुर्ला संकुल, बोरिवली पूर्व, माझगाव आणि वरळी.

सहा महिन्यांच्या पाहणीतील निष्कर्ष

देवनार हे किनारपट्टीवरील सर्वात प्रदूषित ठिकाणांपैकी एक ठरले आहे. मुंबईतील इतर काही भागांमध्येही पीएम 2.5 ची पातळी 40 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या राष्ट्रीय मर्यादेपेक्षा अधिक आढळली आहे. n मुंबईच्या तुलनेत चेन्नई व पद्दुचेरीतील निवासी भागांमधील हवा अधिक स्वच्छ आढळली. विजयवाडा आणि कोलकात्यामध्ये काही ठिकाणी प्रदूषण असले तरी ते मुंबईतील प्रदूषित भागांइतके सातत्यपूर्ण आणि गंभीर नाही.