धर्मांधांच्या दबावामुळे बदलले मुलाचे नाव; वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गोंडा (उत्तर प्रदेश)

उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये 23 मे रोजी जन्म झालेल्या एका मुस्लीम कुटुंबातील मुलाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या दिवशी भाजपच्या झालेल्या ऐतिहासिक विजयामुळे कुटुंबाने आनंदाने मुलाचे नाव मोदी असे ठेवले. मात्र, आता या कुटुंबावर मुस्लीम समुदायाचा आणि धर्मांधाचा दबाव वाढल्याने त्यांना मुलाचे नाव बदलावे लागले आहे. मुलाचे नाव बदलले नाही तर मुलाचे हकीका आणि खतना करणार नाही अशी धमकी मुस्लीम समुदायाने दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तसेच मुलांच्या नावावरून शेजारीही टोमणे मारत होते. त्यामुळे कुटुंबाने मुलाचे नाव मोहम्मद अल्ताफ आलम मोदी असे बदलले आहे.

गोंडामधील मैनाज या मुस्लीम महिलेने 23 मे रोजी एका मुलाला जन्म दिला. त्याच दिवशी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सरकारला ऐतिहासिक यश मिळाले. त्यामुळे मुलाचे नाव मोदी ठेवण्याची इच्छा मैनाज यांनी व्यक्त केली. मैनाज आपल्या निर्णयावर ठाम होती. तिचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी असतो. त्यामुळे तिच्या सासऱ्यांनी मुलाचे नाव मोदी ठेवण्यास मान्यता दिली. त्यानंतर मैनाजच्या नवऱ्याला फोन करूनही त्याचीही सहमती घेण्यात आली. त्यामुळे सरकारी जन्म नोंदणीत मुलाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ही बातमी कळताच नातेवाईक आणि समुदायातील लोकांनी या नावाला आक्षेप घेत नाव बदलण्यासाठी मैनाज आणि कटुंबीयांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मुलाचे नाव बदलले नाही तर त्याचे हकीका आणि खातना करणार नाही, त्यामुळे मुलगा मुसलमान नाही, तर हिंदू म्हणून ओळखला जाईल, अशी धमकी समुदायाकडून देण्यात आली. अखेर समुदायाच्या आणि धर्मांधाच्या दबावापुढे झुकत मैनाज आणि कुटुंबीयांनी मुलाचे नाव बदलून नरेंद्र दामोदरदास मोदी ऐवजी मोहम्मद अल्ताफ आलम मोदी असे ठेवले आहे.