
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बिहारच्या मुझफ्फरपूर येथील बालिकागृहात झालेल्या बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणी सीबीआयने आरोपी ब्रजेश ठाकूर, रवि रौशन, विकास कुमार, दिलीप कुमार वर्मा, रोजी रानी आणि अन्य काहींवर विशेष पॉक्सो कायद्यांतर्गत 73 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात सीबीआयने धक्कादायक खुलासे केले असून अनेक गंभीर आरोप लगवाले आहे.
सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, मुझफ्फरपूर बालिकागृह बलात्कार कांड प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश बालिकागृहातील मुलींना अश्लिल गाण्यांवर डान्स करायला लावायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. मुलींनी या कूकर्माला विरोध केल्यावर ब्रजेशची सहकारी मधू मुलींना जेवणामध्ये फक्त चपाती आणि मिठ देत होती. तसेच तत्कालीन सहाय्यक रोजी रानी हिला बालिकागृहात सुरू असलेल्या अत्याचाराबाबत सर्व माहिती असताना याची ही माहिती जिल्हा प्रशासनाला दिली नाही. सीबीआयने रोजी रानीच्या या कृतीवर ताशेरे ओढत तिने आपल्या कर्तव्याचे पालन केले नसल्याचा आरोप लगावला आहे.
तसेच रोजी रानीने 19 मे 2014 ते 03 ऑगस्ट 2017 या दरम्यान मुझफ्फरपूरमध्ये 11 बालिकागृहांचे निरीक्षण केले होते. यावेळी बालिकागृहातील मुलींनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची वाच्यता रोजी रानीजवळ केली. मुलींनी ब्रजेश ठाकूर, रवि रौशन आणि विकास कुमारच्या दुष्कृत्यांची माहिती दिली होती. तसेच त्यांना विरोधानंतर मारहाणही केली होती. तरीही तिने याबाबत पोलीस अथवा जिल्हा प्रशासनाला कळवले नाही. विशेष म्हणजे बालिकागृहात सर्व काही सुरळीत असल्याचा अहवाल यावेळी देण्यात आला होता.
दरम्यान, चौकशीदरम्यान सीबीआयने पीडित मुलींना रानीचा फोटो दाखवला असता मुलींना त्यांना ओळखले आणि तिला बालिकागृहातील अत्याचारांबाबत माहिती असल्याचे सांगितले. सीबीआयने आपल्या आरोपपत्रामध्ये दोन पीडितांचे कबुलनामे घेतले आहे. याआधारे सर्व आरोपींवर कारवाई केली जाणार आहे.
























































