
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप आणि पोलीस दलातील बदल्यांबाबत पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून विरोधी पक्षाने उडवलेली आरोपांची राळ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे मंत्री हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारकडून अहवाल मागवून तो राष्ट्रपतींकडे पाठवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेतेही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.






























































