
सामना ऑनलाईन । मुंबई
‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडीओज आणि नागराज मंजुळे ‘नाळ’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या 16 नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘नाळ’मधून ते दिग्दर्शनातील पदार्पण करीत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.
असं म्हणतात, जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची कथा आहे लहानग्या चैतन्यची. चैतू आठ वर्षांचा आहे. त्याचे वडील गावातील एक प्रतिष्ठित जमीनदार आहेत जे चैतूचे सगळे हट्ट पुरवतात. प्रेमळ आणि मायाळू आई त्याचे खूप लाड करते. अशा सुंदर वातावरणात वाढणार्या चैतन्यच्या भावविश्वाचा अनपेक्षित प्रवास नाळच्या कथासूत्रात उलगडताना दिसेल. या चित्रपटातील ‘जाऊं दे न व’ या गाण्याला तीन दिवसांत 10 लाख व्ह्युज मिळाले असून हे गाणे ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ मधून अल्पावधीतच सर्वांचा लाडका झालेला जयस कुमार याने गायले आहे.




























































