दुखापतग्रस्त नदाल विम्बल्डनबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘माझ्या पोटाचे स्नायू दुखापतग्रस्त असताना मी विम्बल्डनच्या पुढच्या लढती जिंकू शकत नाही याचे भान ठेवूनच आत्मसन्मानासाठी मी स्पर्धेतून माघार घेत आहे,’ असे सांगत ‘टेनिस सुपरस्टार’ राफेल नदाल यांने यंदाच्या विम्बल्डनला बायबाय केले आहे. राफेलच्या या निर्णयाने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला उपांत्य लढत न खेळताच आपल्या कारकीर्दीतील ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश मिळाला आहे. 

नदालला स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पोटातील स्नायूंमध्ये दुखापत होती. बुधवारी झालेल्या टेलर फ्रिट्झविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत ही दुखापत वाढली, मात्र असह्य वेदना होत असतानाही नदालने लढा देत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. झुंजार खेळ करणारा नदाल अखेर शारीरिक दुखण्यापुढे हतबल ठरला आणि त्याने विम्बल्डनमधून माघार घेण्याचा निर्णय मोठय़ा दुःखाने घेतला. स्टार नदालच्या अनपेक्षित माघारीने जगभरातील त्याच्या चाहत्यांना आणि टेनिसशौकिनांना मोठा धक्का बसला आहे. 

माझ्यासाठी आत्मसन्मान आणि आनंदही मोठा 

टेनिस कारकीर्दीत जिद्दीने मार्गक्रमण करीत मी 22 ग्रॅण्डस्लॅम विजेतीपदे मिळवली आहेत. पण यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात माझ्या पोटाच्या दुखापतीने उचल खाल्लीय. मी आता पुढच्या लढती शारीरिक दुर्बलतेच्या समस्येमुळे जिंकू शकत नाही हे मला कळतेय. मग अशा स्थितीत उगाच खेळून मला माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवायची नाहीय. दुःखाने आणि नाइलाजाने का होईना शरीराच्या भल्यासाठी आणि माझ्या आयुष्यातील पुढच्या आनंदासाठी मी माघार घेत आहे.  ही दुखापत जास्त दीर्घकाळ राहू नये यासाठी हा निर्णय मी घेतला आहे. माझ्या चाहत्यांना या स्पर्धेत माझा खेळ पाहायला मिळणार नाही त्याबद्दल त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतोय, अशा शब्दांत ‘ग्रॅण्डस्लॅम स्टार’ नदाल याने आपल्या विम्बल्डनमधील माघारीबद्दलची भावना बोलून दाखवली.