
ठेकेदाराकडून 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने अटक केलेला महापालिकेचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर याच्या पुण्यातील घरात घेतलेल्या झाडाझडतीमध्ये मोठे घबाड सापडले. लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत साडेअकरा लाखांची रोकड, अर्धा किलो सोन्याचे दागिने व दीड किलो चांदी जप्त केली.
दरम्यान, मानकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी बुधवारी मानकर याला महापालिकेतून अटक केली होती. ठेकेदाराचे चेक काढण्याच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची मागणी मानकर यांनी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज मानकर याच्या पुणे येथील घरात झडती घेतली. यावेळी घरामध्ये 11 लाख 50 हजारांची रक्कम व 540 ग्रॅम सोन्याचे दागिने, दीड किलो चांदीच्या वस्तू पथकाला मिळाल्या आहेत. तसेच, या झडतीमध्ये तीन फ्लॅटची कागदपत्रे मिळून आली आहेत. रोखरकमेबाबत मानकर यांच्या पत्नीस वैध कारण न देता आल्यामुळे सदरची रक्कम जप्त केल्याचे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी स्पष्ट केले.



























































