नगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड – पोलिसांनी पत्र देऊनही विद्युत निरीक्षकांचा अहवाल मिळेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा रुग्णालय अग्निकांडाचा अहवाल मिळावा, यासाठी पोलिसांकडून विद्युत विभागाला चार पत्रे देण्यात आली असून, अद्यापि त्यांच्याकडून उत्तर मिळाले नसल्याची माहिती तपास अधिकारी संदीप मिटके यांनी दिली. निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांचे दोन वेळा जवाब घेतल्याचे त्यांनी सांगितले.

नगर जिल्हा रुग्णालयाच्या जळीत हत्याकांड प्रकरणाला आता 16 दिवस उलटून गेले आहेत. राज्य सरकारने नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र समिती नेमली आहे. या समितीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, डॉ. पोखरणा यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला असून, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी त्यावर आक्षेप घेत आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, मग जामिनाचा विचार करावा, असे म्हटले आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

मृतांची संख्या 14वर

जिल्हा रुग्णालयात आग लागून सुरुवातीला 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता ही संख्या वाढली असून, खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या रंभाबाई अंजराम विधाते (वय 80) यांचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 14 झाली आहे.

पोखरणांचे कॉल रेकॉर्ड, बँक स्टेटमेंट तपासा!

निलंबित शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीमध्ये मोबाईलचे कॉल रेकॉर्ड, बँक स्टेटमेंट घेऊन न्यायालयात सादर करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व तपास अधिकाऱयांकडे केली आहे. हा गुन्हा गंभीर असल्याने त्यांच्या राहत्या घराची झडती घेऊन त्यातून मिळालेले पुरावे न्यायालयासमोर सादर करावेत, असे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.