
परतीच्या व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसान भरपाईपोटी नगर जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यात 296 कोटी 20 लाख 13 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी संबंधित यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तलाठी यांच्यापासून तहसीलदारापर्यंतची यंत्रणा कामाला लागली होती. आठ दिवसांमध्ये पंचनामे करून त्यांनी वरिष्ठ पातळीवर नुकसानीचा अहवाल पाठवला होता. नगर जिल्ह्यामध्ये साधारणत 475 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारला प्राप्त झाला होता.
नगर जिल्ह्याला यापूर्वी पहिल्या टप्प्यात 135 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्यात प्राप्त अनुदानातून जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फटका 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांना बसला असून 475 कोटींचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदतीपोटी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अनुदानातून केवळ 2 लाख 47 हजार शेतकऱ्यांना मदत देणे शक्य झाले होते. तर, अद्यापही 3 लाख 86 हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असून आता या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेल्या 296 कोटींच्या अनुदानातून मदत दिली जाणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये सुरुवातीचे 135 कोटी रुपयांचे वाटप पूर्णत्वाला गेले. त्यानंतर अनेक भागांमध्ये अद्यापही वाटप झाले नव्हते. त्यामुळे उर्वरित रक्कम कधी येणार याची प्रतीक्षा अनेक शेतकऱ्यांना होती. त्यातच शुक्रवारी 296 कोटी रुपयांची मदत येथील प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळणार आहे.































































