
मुंबई-पुण्याप्रमाणेच नगरपासून पुण्यापर्यंत इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी व त्या संबंधीची तरतूद संबंधित विभागामार्फत केली जावी, अशी मागणी नगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्याच्या चर्चा दरम्यान ते बोलत होते.
नगर ते पुणे आंतर जरी 120 ते 130 किलोमीटर असले तरीसुद्धा या रस्त्यावरची वाहतूक कोंडी व रस्त्यावर अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, नगर-पुणे ट्रेनची आवश्यकता आहे. याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून आपणास लोकांच्या अनेक निवेदन प्राप्त झाले असून या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांच्या दरम्यान या रेल्वेची तरतूद करावी जेणेकरून प्रवाशांची, रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांची व उद्योगधंद्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय टळेल व नगरच्या विकासास चालना मिळेल, असे यावेळी बोलताना विखे म्हणाले.




























































