नगर : राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेला जोड्यांनी चोपलं; निकालानंतर शिवसैनिकांनी दिल्या सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर त्याचे पडसाद राज्यभर आता उमटू लागले आहेत. नगर शहर शिवसेनेच्यावतीने नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी नार्वेकरांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी युवासेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, पप्पू भाले यांच्यासह शिवसैनिक उपदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अपात्रतेबाबत निकाल देण्याचा आदेश दिल्यानंतर काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला एकतर्फी निकालाचे पाहता त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. नगर शहर शिवसेनेच्या वतीने आज नेताजी सुभाष चौकामध्ये भाजपाच्या विरोधात व विधानसभाअध्यक्ष नार्वेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. गद्दारांचे करायचे काय खाली डोके वरती पाय, एकतर्फी निर्णय देणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो यासह ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी काल जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा असून सरकारच्या दबावाला बळी पडून हा निर्णय घेतला आहे. एकतर्फी निर्णय घेऊन त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबद्दल कशा पद्धतीने आकस आहे हे दाखवून दिलेले आहे व यांचा खरा चेहरा आज उघड झालेला आहे. त्यामुळे या गद्दारांना आता जनता माफ करणार नाही. तसेच ज्यांनी निकाल दिला त्यांच्या विरोधामध्ये पक्ष वरिष्ठ निश्चितपणे दाद मागतील मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांना कालचा निकाल पटलेला नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आता व्यक्त करण्यात आलेला आहे आगामी काळामध्ये यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असंही यावेळी सांगण्यात आलं.