पटोलेंचे ‘ना… ना…’राजकीय संन्यास घेण्याबद्दल घूमजाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नागपूर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातून निवडून आल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, अशी जाहीर वल्गना करणारे काँग्रेसचे नागपुरातील उमेदवार नाना पटोले यांनी घूमजाव करत आपली ती घोषणा राजकीय जुमलेबाजी होती, अशी कबुली दिली. आपण राजकीय संन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट केले. मोदी, शहा जुमलेबाजी करू शकतात तर मी पण करू शकतो असे पटोले म्हणाले.

नागपूर लोकसभा मतदारसंघात गडकरी यांच्याकडून 2 लाख 16 हजार मतांनी पराभूत होणाऱया पटोले यांनी पराभवाची कारणमीमांसा करताना ईव्हीएम आणि निवडणूक प्रशासनाला दोष दिला. आम्ही तुम्हाला मते दिली, असे अनेक लोक मला विचारत होते. त्यांची मते गेली तरी कुठे हा प्रश्न मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे ईव्हीएमबाबत मनात संशय कायम आहे. आम्ही ईव्हीएम व नागपुरातील निवडणूक प्रशासनाबाबत पहिल्या दिवसापासून तक्रारी करीत होतो. आतापर्यंत आम्ही 53 तक्रारी केल्या आहेत. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या भूमिकेत असलेले जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पक्षपाती भूमिका पार पाडली. याबाबतचे सर्व पुरावे काँग्रेसच्या लिगल सेलकडे दिले असून जिल्हाधिकारी मुद्रल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे पटोले यांनी सांगितले.

केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. केंद्रातील वजनदार मंत्रीही नागपूरचे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी मुद्रल यांचे वागणे तानाशाही पद्धतीचे होते. ते कोणाच्या इशाऱयावरून काम करीत आहेत, याचा शोध तुम्हीच लावण्याचे आव्हान त्यांनी प्रसार माध्यमांना दिले.

पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने तुम्ही जबाबदारी स्वीकारणार काय, या प्रश्नावर पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्याची तयारी असल्याचे पटोले म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीबाबत 7 आणि 8 जून रोजी नागपुरात काँग्रेसची बैठक होणार असून त्या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा बिगुल वाजणार आहे. नागपुरात गुन्हेगारी, पाणी आणि प्रदूषणाची समस्या आहे. यावर विरोधी पक्ष म्हणून आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.