
>>दिलीप जोशी
‘षटकार सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱया नायडूंची क्रिकेट कारकीर्द विलक्षण आहे, आजही आपल्या क्रिकेटपटूंचा जगात दबदबा आहे. त्याचा पाया पद्मभूषण, कर्नल सी.के. नायडू यांनी घातला.
क्रिकेटचा आयपीएल मोसम नुकताच संपला. आता उदंड लोकप्रियता लाभलेला हा खेळ जगातले काही अपवाद वगळता सर्वत्र खेळला जातो. अगदी गल्लीपासून ते जगातल्या मोठमोठय़ा शहरांमधल्या स्टेडियमवर त्याचा आविष्कार घडतो. हिंदुस्थानात तर बालवयात क्रिकेटची बॅट हाती न धरलेला सापडणं कठीण. 1932 मधल्या पहिल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे कर्णधार होते कर्नल सी.के. नायडू. कालांतराने त्यांनी क्रिकेटप्रेमींना कोणता संदेश दिला त्याचं छोटंसं ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. ‘षटकार (किंवा सिक्स) सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱया नायडूंची क्रिकेट कारकीर्द विलक्षण आहे, पण त्या ध्वनिमुद्रणाविषयी वाचण्यापूर्वी थोडं एकूणच जागतिक क्रिकेटविषयी.
आपल्याकडेही ‘चेंडू-फळी’चा खेळ पूर्वापार खेळला जायचा असं म्हटलं जातं, परंतु आधुनिक क्रिकेटचे ‘स्टम्प’ रोवले गेले ते इंग्लंडमध्ये. अगदी तेराव्या शतकापासून ‘क्लब-बॉल’ म्हणून हा खेळ खेळला जायचा. अंडरआर्म (सरपटी?) पद्धतीने टाकलेला चेंडू हॉकी स्टिकसारख्या काठीने टोलवणं असं क्रिकेटचं प्राथमिक स्वरूप होतं. त्यानंतर त्यात वेळोवेळी अनेक बदल होत होत आजच्या क्रिकेटची संहिता तयार झाली. आज आपण ज्या पद्धतीचं क्रिकेट पाहतो ते साधारण 1550 च्या सुमारास खेळलं जाऊ लागलं. अठराव्या शतकाच्या आरंभी इंग्लंडमधल्या फिन्सबरी येथील मैदानात रंगलेला क्रिकेटचा सामना पाहायला बरेच लोक जमले आणि तो इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ झाला.
आधी केवळ अंडरआर्म, मग राऊंडआर्म आणि ओव्हरआर्म अशी प्रगती होत सामने रंगायला लागले. 1840 नंतर फोटोग्राफीचा शोध लागला आणि 1957 मध्ये रॉजर फेन्टन यांनी एका क्रिकेट सामन्याचा जगातला पहिला फोटो घेतला असं म्हटलं जातं. इंग्लंडच्या क्रिकेट संघाने 1859 मध्ये उत्तर अमेरिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आरंभ केला. 1928 मध्ये वेस्ट इंडीजचा स्वतंत्र संघ तयार झाला. हिंदुस्थानात ब्रिटिशांचं राज्य असतानाच 1932 मध्ये आपला निराळा क्रिकेट संघ इंग्लंडशी झुंज देऊ लागला. त्याचं नेतृत्व सी. के. नायडू यांनी केलं.
दक्षिण हिंदुस्थानातून येऊन नागपूरला स्थायिक झालेलं नायडू कुटुंब. त्यांचे वडील प्रख्यात वकील होते. या सधन कुटुंबात 1895 मध्ये सी.के. नायडू यांचा जन्म झाला. त्या काळात इंग्लंडला जाणाऱया या मंडळींना क्रिकेटची आवड निर्माण झाली यात नवल नाही. 1923 मध्ये सी.के. नायडू इंदूरच्या राजे होळकरांकडच्या सैन्यात कॅप्टन आणि नंतर ‘होळकर आर्मी’मध्ये कर्नल झाले. तिथल्या क्रिकेट संघातून खेळू लागले. अर्थात क्रिकेटची आवड त्यांना बालपणापासूनच होती. 1916 पासून ते फर्स्ट क्लास क्रिकेट खेळू लागले. नागपूरचे असल्याने नायडू उत्तम मराठी बोलत. एवढंच नव्हे तर त्यांना नाटय़ संगीताची आवड होती असं मला शतायुषी गायक-नायक मास्टर अविनाश (मोहिते) यांनी सांगितलं होतं!
1926 मध्ये आर्थर गिलिवान एमसीसी संघ घेऊन हिंदुस्थानात आला. त्याच्याविरुद्ध खेळताना मुंबईच्या जिमखान्यावर सी.के. नायडूंनी षटकारांचा पाऊस पाडला! 11 सणसणीत षटकार ठोकून त्यांनी कमाल केली. पुढे 1932 मध्ये हिंदुस्थानी संघाचे कॅप्टन झाल्यावर इंग्लंडविरुद्ध खेळताना त्यांनी मुंबईतच बेबॉर्न स्टेडियमवर षटकारांची आतषबाजी केली. त्यांनी दणकून टोलवलेला बॉल थेट राजाबाई टॉवरपर्यंत गेल्याची दंतकथा आमच्या बालपणी प्रचलित होती. नायडू शेवटचा सामना खेळले ते वयाच्या 62 व्या वर्षी! त्यामुळे क्रिकेटपटूंच्या फिटनेसबद्दल सांगायचा अधिकार त्यांना नक्कीच होता. त्यांच्या ध्वनिमुद्रित भाषणात त्याचा उल्लेख येतोच. कर्नल सी.के. नायडू म्हणतात… ‘‘क्रिकेटविषयी बोलायचं तर हिंदुस्थानची क्रिकेट परंपरा अभिमानास्पद आहे. त्यात आणखी विकास आणि प्रगती होईल याबद्दल मला विश्वास वाटतो. कारण प्रत्येक हिंदुस्थानी माणसाला आज क्रिकेटची आवड आहे. आपल्याकडे तो राष्ट्रीय खेळ झाला आहे. तरुण मित्रांनो, उत्तम क्रिकेटपटू व्हायचं असेल तर पहिल्या दिवसापासूनच चांगली शारीरिक क्षमता हवी. त्यासाठी चालणं, धावणं, दोरीच्या उडय़ा (स्किपिंग) यांचा सराव हवा. क्रिकेटमध्ये बॅटिंग, बोलिंग याइतकीच फिल्डिंग खूप महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. ती एक महत्त्वाची गोष्ट समजून त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण एखादा ‘ब्रिलियन्ट कॅच’ आपलं शतक हुकवू शकतो. षटकाराच्या फुलस्ट्रोकचाही अभ्यास करा. आपलं ध्येय आधीच ठरवा. जय-पराजय हा खेळाचा एक भाग आहे, परंतु क्रिकेटमुळे सर्व जग एकत्र आलंय. मी आज क्रिकेट क्षेत्राच्या बाहेर असलो तरी तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. हिंदुस्थानी क्रिकेटचा पौर्वात्य प्रकाश जगभर पसरविण्याचा काळ दूर नाही.’’
सी.के. यांचे हे बोल सार्थ ठरले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर असे तेजस्वी हिरे आपण जगाला दिले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वकप जिंकून (1983) आपण विक्रम घडवला. आजही आपल्या क्रिकेटपटूंचा जगात दबदबा आहे. त्याचा पाया षटकार सम्राट, पद्मभूषण, कर्नल सी.के. नायडू यांनी घातला हे विसरता येत नाही.
[email protected]




























































