हे रात्री आणि पहाटेच्या गोष्टी का करतात कळेना! नाना पटोले यांचा चिमटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरवणी मागण्यांत विकासाचा समतोल साधला आहे हे अजित पवारांनी सांगावे. म्हणजे आज रात्री बसून आम्ही आकडेवारी टॅली करून बघू की खरंच विकास झाला किंवा नाही, या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ‘हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी का करतात’, असा जोरदार टोला लगावला. हा टोला विरोधी पक्षाला वर्मी लागल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला.

वैधानिक विकास महामंडळे जाहीर करा या विरोधकांच्या मागणीवर सुरू झालेल्या चर्चेत नाना पटोले यांनी भाग घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रात्रीची खलबते आणि पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी विकास निधीच्या समतोलाची रात्री टॅली करू या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा बॅकलॉग वाढला का? याचीही माहिती आपण सभागृहाला दिली पाहिजे’, असं म्हणतानाच मुनगंटीवारांच्या रात्रीच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन ‘हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी करतात. ते तसं का करतात, मला अजून कळलं नाही’ असं पटोले म्हणाले! असं म्हणताच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर काहीसा हशा पिकला!’

राज्यपालांची भूमिका संशयास्पद

‘वैधानिक विकास महामंडळांची निर्मिती आणि विदर्भ-मराठवाडा मागास भागाच्या विकासाची संकल्पना हे मुद्दे महत्त्वाचे आहेतच. मात्र, त्याचप्रमाणे राज्यपालांची 12 आमदारांबद्दलची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. राज्यपाल सगळय़ाच पक्षांचे आहेत. मात्र राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. कामकाज नियमाने व्हावं अशी विरोधी पक्षनेत्यांची जी भूमिका आहे ती माझीही आहे,’ असा टोला नाना पटोले यांनी लगावताच पुन्हा एकदा गोंधळ झाला. यावेळी अजित पवार यांनी वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्दय़ावर स्वतः उत्तर दिले.