‘नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस’साठी मुंबईकरांची एकजूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईचे आद्य शिल्पकार आणि हिंदुस्थानच्या रेल्वेचे जनक नामदार नाना जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यासाठी राज्यातील नानाप्रेमी एकवटले आहेत. या देशात रेल्वेचा पाया रचणाऱया नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई टर्मिनसला देण्यास सरकारला कोणत्या अडचणी आहेत?, इतर रेल्वे स्थानकांची नामकरणे जोरात होत असताना देशात रेल्वे आणणाऱया नानांचेच नाव देण्यास टाळाटाळ का सुरू आहे, असा संतप्त सवाल नाना शंकरशेट प्रतिष्ठानने केला आहे.

हिंदुस्थानमध्ये पहिली रेल्वे सुरू करतानाच नानांनी त्यांच्या वाडय़ात रेल्वेचे पहिले कार्यालय सुरू केले. मुंबई महापालिका, मुंबई विद्यापीठ, एलफिन्स्टन महाविद्यालय, मुंबईतील पहिली हिंदू स्मशानभूमी यासारख्या असंख्य संस्था उभारतानाच समाज सुधारणांचा पाया त्यांनी रचला. व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणी 1996 मध्ये सर्वप्रथम नाना शंकरशेट प्रतिष्ठानने केली होती. मात्र तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांनी छत्रपती शिवरायांचे नाव देण्याचा प्रस्ताव आणताच प्रतिष्ठानने नानांचे नाव देण्याचा आग्रह मागे घेतला. त्याचवेळी नाना शंकरशेट प्रतिष्ठानने कलमाडी यांना मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे नामकरण नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस असे करावे याबाबतचे निवेदन दिले. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनाही निवेदने देण्यात आली.

आठवलेंना संमतीचा विसर पडला का?

12 जुलै 2011 मध्ये नाना शंकरशेट प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांना मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव देण्याचा संपूर्ण पत्रव्यवहार व कागदपत्रे दाखवली व नानांचे नाव देण्यास आठवलेंनी संमती द्यावी, असे निवेदनही त्यांना दिले. त्यावेळी तुमचा प्रस्ताव योग्य आहे असे सांगत आठवलेंनी ते निवेदन स्वीकारले व स्वाक्षरीही केली, असे असताना त्यांना याचा विसर कसा पडला? त्यांनी अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कसे पुढे केले, असा सवाल प्रतिष्ठानचे सरचिटणीस मनमोहन चोणकर यांनी केला.

मुंबई महापालिकेने 2011 मध्ये केला ठराव

शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक मनमोहन चोणकर यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस नामकरण करावे, असा ठराव 2011 मध्ये तमाम मुंबईकरांच्या वतीने मांडला. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा ठराव एकमताने मंजूर केला. तोही सरकारला पाठवण्यात आला. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव देण्यासाठी मुंबईकरांनी अशी एकजूट दाखवली. दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या टर्मिनसला नानांचे नाव देण्यास अनुकूलता दाखवली असून आता टाळाटाळ न करता लवकरात लवकर यातील अडथळे दूर करावेत अशी मागणी नाना शंकरशेट प्रतिष्ठानने केली आहे.