
सामना ऑनलाईन,मुखेड
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने शासनाला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत जर मराठा समाजास आरक्षण मिळाले नाही तर २० नोव्हेंबरपासून कोणत्याही पुढाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.मुखेड येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी नानासाहेब जावळे यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावरही टिका केली.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मुखेड येथे पहिली सभा जिल्हा परिषद मुलींच्या हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. महेश डोंगरे, सोलापूर यांची या सभेस प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जावळे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने प्रयत्न केले नाहीत, आता मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांच्या गावबंदी केली पाहिजे, असेही ते म्हणाले. मराठा मोर्चाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर लाखो मराठा बांधव आमरण उपोषण करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

































































