मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आणखी एकाची आत्महत्या, दोन दिवसात दोघांनी संपवले जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणावरून एकीकडे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे आत्महत्यांचे सत्रही सुरुच आहे. नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने मृत्युला कवटाळले आहे. नायगाव तालुक्यातील भोपळा येथील एका शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ओमकार बावणे (वय – 17) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्याने विहिरीत उडी घेतली. मराठा आरक्षणासाठी गेल्या दिवसात नांदेडमध्ये दोघांनी आत्महत्या केल्याने समाज आक्रमक झाला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हदगाव तालुक्यातील वडगाव येथील 23 वर्षीय शुभम पवार या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली होती. रविवारी शुभमच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आली. त्याच्या चितेची आग शांत होत नाही तोच ओमकार बावणे या शालेय विद्यार्थानेही आरक्षणासाठी आत्महत्या केली. विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी ओमकारने एक चिठ्ठी लिहून ठेवली.

माझे आई-वडील मोलमजुरी करून आम्हाला शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला बघवत नव्हती आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे, असे या चिठ्ठीत लिहिले आहे. या प्रकरण रामतीर्थ पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी गत दोन दिवसात दोघांनी आत्महत्या केल्याने आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

नांदेडच्या हदगावात मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; कडकडीत बंद

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊन ओमकार बावणे याच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही असा निर्णय गावकऱ्यांनी व कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे नायगाव रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी 24 तारखेची डेडलाइन, 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण