
सामना प्रतिनिधी । नांदेड
गुरुद्वारा कायद्यामधील कलम 11 मध्ये शासनाने जी दुरुस्ती केली आहे ती त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शीख समाजाचा मोठा मोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. बाबा बलविंदरसिंघजी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात नवनियुक्त गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य गुरमितसिंघ महाजन, रविंद्रसिंघ बुंगई, मनप्रितसिंघ कुंजीवाले, रविंद्र मोदी यांच्यासह शीख समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मोर्चास संबोधित करताना संत बाबा बलविंदरसिंघजी म्हणाले की, ‘गुरुद्वारा बोर्डात शासनाने केलेली सुधारणा अन्यायकारक आहे. या सुधारणेनुसार गुरुद्वारा बोर्डाचा अध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकार शासनास देण्यात आले आहेत. शीख समाजास हे मान्य नाही. गुरुद्वारा बोर्डाचा अध्यक्ष नियुक्त सदस्यांमधूनच झाला पाहिजे. राज्याच्या एका मुख्यमंत्र्याने गुरुद्वारा बोर्डाची जमीन बळजबरीने अधिग्रहीत केली होती, परंतू शीखांच्या गुरुंनी अरदास केल्यानंतर दोनच महिन्यात त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. याची आठवण करुन देऊन बाबा बलविंदरसिंघजी यांनी करून दिली. तसेच शीखांच्या भावनांशी खेळणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते, असेही ते यावेळी म्हणाले.






























































