नाकाबंदी धुडकावून सुसाट धावणार्‍या स्कॉर्पिओ गाडीसह संशयीताला घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाकाबंदी धुडकावून सुसाट धावणार्‍या एका संशयास्पद स्कॉर्पिओ गाडीवर बिलोली हद्दीत सिनेस्टाईल गोळीबार करत रामतीर्थचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी गुरुवारी मध्यरात्री केलेल्या धाडसी कारवाईत एका संशयीत युवकास ताब्यात घेतले आहे. तर अन्य चार जण अंधाराचा फायदा घेत फरार झाले. यातील तिघे भिवंडी, मुंब्रा व कल्याण येथील रहिवाशी असून हे सर्वजण कुठे व कशासाठी जात होते? याचा कसून तपास सुरु असून एका मोठया रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पहाटे घटनेचा आढावा घेतला.

गुरुवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या पथकाची पेट्रोलिंग व नाकाबंदी सुरु होती. त्याचवेळी नरसी येथील विश्रामगृह परिसरात एमएच-04 पासिंगच्या एका स्कॉर्पिओची संशयास्पद हालचाल दिसून आली. अधिक चौकशीसाठी स्कॉर्पिओ बाजूला घेण्याची सुचना पोलीसांनी केली. परंतु स्कॉर्पिओ चालकाने पोलीसांना टाळत गाडी भरधाव वेगाने बिलोलीच्या दिशेने पळवली. त्यामुळे संदिग्धता वाढल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी त्या स्कॉर्पिओचा पाठलाग सुरु केला. यावेळी ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून त्यांनी भरधाव स्कॉर्पिओला थांबवण्याचा अनेकवेळा इशारा दिला. पण चालकाने प्रतिसाद दिला नाही. पुढे बिलोली पोलीसांना संदेश जाताच त्यांनी बॅरीकेटींग केली. पण बॅरीकेटींग तोडून सुसाट स्कॉर्पिओ कुंडलवाडीच्या दिशेने पळाली. आधीच अलर्टवर असलेल्या कुंडलवाडी पोलीसांनी रोडवर एक ट्रक आडवा लावला. त्यामुळे स्कॉर्पिओ चालकाने वायुवेगाने गाडी परत नरसी मार्गावर वळवली. यात एक दुचाकीही उडवली.

दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी संशयीत स्कॉर्पिओ गाडीच्या टायरच्या दिशेने गोळी झाडली. फायरींगनंतर धास्तावलेल्या संशयीतांनी गाडी तळणी रस्त्यावरुन आत घातली व अडकून पडले. अंधारातील या फिल्मीस्टाईल पळापळीत इलियास कुरेशी रा.कल्याण याच्या मुसक्या आवळण्यात रामतीर्थ पोलीसांना यश आले. तसेच एलसीबीने तपासचक्र फिरवून इतर तिघांना ताब्यात घेतल्याचे कळते. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. सध्या या संशयीताची कसून चौकशी सुरु असून स्कॉर्पिओमधील पाचपैकी तिघे जण मुंबईचे रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती असून दुसरे दोघे नांदेडमधील असल्याचे कळते.

हे सर्व संशयीत कुठे, कशासाठी व कोणत्या उद्देशाने जात होते याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत असून या संशयीतांची नावे मात्र अद्याप कळू शकलेली नाहीत. याविषयी अधिक चौकशी नंतरच या संशयीतांचे रहस्य बाहेर येणार असून एका मोठया रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी शुक्रवारी घटनास्थळाचा आढावा घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.