
सामना ऑनलाईन । मुंबई
रविवार आणि सुट्टी हे समीकरण आता घट्ट झाले आहे. खाजगी असो वा शासकीय बहुतांश कर्मचार्यांची साप्ताहिक सुट्टी ही रविवारी असते. कामगारांना एक साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी एका मराठी माणसाने तब्बल सात वर्षे संघर्ष केला होता. नारायण मेघाजी लोखंडे असे या व्यक्तीचे नाव.
कामगरांना साप्ताहिक सुट्टी आणि लंचब्रेक मिळवून देण्यात नारायण लोखंडे यांनी संघर्ष उभारला होता. 129 वर्षापूर्वी जेव्हा देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. तेव्हा फक्त सरकारी अधिकार्यांना साप्ताहिक सुटी होती. सामान्य कामगारांना साप्ताहिक सुट्टी नव्हती. लोखंडे यांनी ब्रिटिश अधिकार्यांकडे सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव ब्रिटिशांनी फेटाळला. नंतर लोखंडे यांनी ब्रिटिश सरकारविरोधात लढा उभारला. तब्बल सात वर्षानंतर 10 जून 1890 साली ब्रिटिशांनी लोखंडे यांचा प्रस्ताव मान्य करत कामगारांना साप्ताहिक सुट्टी जाहीर केली.
लंच ब्रेक
कामगारांना कामच्या वेळेत अर्धा तास विश्रांतीसाठी मिळावा अशी मागणीही लोखंडे यांनी केली होती. ब्रिटिशांनी ही मागणीही मान्य केली. नंतर या विश्रांतीचे रुपांतर जेवणाची सुट्टी तसेच लंच ब्रेक म्हणून ओळखले जाऊ लागले.
रविवारच का?
जगभरात ख्रिश्चन समाजातील लोक रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात. हीच गोष्ट समोर ठेवून प्रत्येक कामगाराला रविवारची साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली.






























































