
‘ मी नॉर्मल माणूस आहे काय, कॅबिनेट मंत्री आहे. पोलीस मला अटक करू शकत नाही,’ अशी गुर्मीची भाषा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची हेकडी रत्नागिरी पोलिसांनी आज उतरवली. मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱया नारायण राणे यांना पोलिसांनी दुपारी उचलले आणि अटक करून थेट संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले. अटकपूर्व जामिनासाठी राणे यांच्या वकिलांनी रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत धावाधाव केली, पण रत्नागिरी आणि उच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी त्यांची याचिका फेटाळण्यात आली. महाड पोलिसांत राणेंविरोधात गुन्हा दाखल असल्याने रत्नागिरी पोलिसांनी त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले. सायंकाळी राणेंना घेऊन पोलीस महाडला रवाना झाले. दरम्यान, रात्री राणे यांना महाड कोर्टात हजर केले असता पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली. मात्र कोर्टाने राणे यांची जामिनावर मुक्तता केली.
जन आशीर्वाद यात्रा काढणारे नारायण राणे सोमवारी महाडमध्ये होते. तेथे संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राणे आणि भाजपविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांनी रात्रीच पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली आणि कारवाईची मागणी केली. नाशिकचे आयुक्त दीपक पांडे यांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेऊन राणे यांच्या अटकेचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर नाशिक पोलिसांचे एक पथक अटकेच्या कारवाईसाठी सकाळी चिपळूणच्या दिशेने रवानाही झाले. दरम्यान, आज सकाळपासून राणेंविरोधात राज्यभरात संतप्त निदर्शने, आंदोलने सुरू झाली होती. संतापलेले शिवसैनिक रस्त्यांवर उतरले होते. तिकडे महाड आणि पुणे पोलिसांनीही राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते.
नारायण राणे यांची यात्रा आज चिपळुणात पोहचली होती. तेथे पत्रकारांनी त्यांच्यावर दाखल गुह्यांविषयी त्यांना विचारले असता राणे गुर्मीत म्हणाले, ‘मी नॉर्मल माणूस आहे काय, कॅबिनेट मंत्री आहे.’ ते एवढय़ावरच थांबले नाही तर माझी बदनामी कराल तर तुमच्यावरच गुन्हा दाखल करेन, अशी थेट धमकीच त्यांनी पत्रकारांना दिली.
पोलिसांनी इंगा दाखवला
केंद्रीय मंत्री असल्याने आपल्याला अटक होऊ शकत नाही या भ्रमात नारायण राणे होते, पण रत्नागिरी पोलिसांनी हा भ्रमाचा भोपळा फोडला. अटक झाली तर? या नुसत्या कल्पनेनेच राणे धास्तावले आणि मग त्यांची अटकपूर्व जामिनासाठी पळापळ सुरू झाली. त्यांचे वकील रत्नागिरी न्यायालयात गेले, पण तेथे याचिका फेटाळली गेली. राणेंच्या मुंबईतील वकिलांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले, पण या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची गरज नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि मग या, असे खंडपीठाने सुनावले आणि राणेंची याचिकाच फेटाळून लावली. त्यामुळे नारायण राणे यांना अटक होणारच यावर शिक्कामोर्तब झाले.
गोळवलीत ताब्यात घेतले
राणे यांची यात्रा दुपारी संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे पोहचली होती. त्यावेळी तेथे रत्नागिरी पोलिसांचे एक पथक गेले आणि राणेंना अटक करून त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले आणि मग राणेंची ही ‘यात्रा’ पुन्हा उलटय़ा पावली महाडच्या दिशेने रवाना झाली.
महाड कोर्टात काय घडले…
पोलिसांनी रात्री 9.45च्या सुमारास नारायण राणे यांना महाड येथील प्रथम न्याय दंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाकडून ऍड. प्रकाश जोशी यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी दंडाधिकाऱयांकडे केली. एका केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने बेजबाबदार व्यक्तव्य करणे कितपत योग्य आहे, असा सवाल सरकारी वकिलांनी उपस्थित केला. राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबतच वक्तव्य केले आहे. त्यांच्याविरोधात लावलेली कलमे योग्यच असल्याचे ऍड. जोशी यांनी सांगितले. यावर राणे यांची बाजू मांडताना ऍड. अधिक शिरोडकर, ऍड. अनिकेत निकम आणि ऍड. राहुल साळुंखे यांनी राणेंच्या प्रकृतीचा हवाला दिला. तसेच त्यांचे वक्तव्य हे राजकीय असल्याने त्यावर तातडीने कारवाईची गरज नाही, असे सांगितले. 153 अ व 505 या दोन कलमांन्वये केलेली कारवाई चुकीची असल्याचेही राणेंच्या वकिलांनी सांगितले.
अटक होताच तब्येत बिघडली
नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आणि प्रचंड बंदोबस्तात त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मात्र अटक झाल्यावर राणे यांची तब्येत बिघडली. डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी राणे यांचा ईसीजी काढला आणि त्यांचा रक्तदाब वाढला असल्याचे पत्रकारांना सांगितले.
- गेल्या 20 वर्षांत एका केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.
पोलीस ठाण्यात उपोषण‘नाटय़’… पण पोलिसांनी ‘लाड’ खपवून घेतले नाही
नारायण राणे यांच्या सुटकेसाठी संगमेश्वर पोलीस ठाण्यात उपोषण‘नाटय़’ही करण्यात आले. राणेंची दोन मुले आणि आमदार प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात बसकन मारली आणि राणे यांना पोलीस ठाण्याबाहेर नेऊ देणार नाही. तोपर्यंत आम्ही उपोषण करणार, अशी धमकीच दिली. हे नाटय़ फेसबुकवर लाइव्ह दाखवण्यासही लाड विसरले नाही. मात्र प्रसाद लाड यांचे हे ‘लाड’ खपवून न घेता पोलिसांनी राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यातही दिले.
महाड ते महाड
23 ऑगस्ट
सायं. 7.30
महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नारायण राणेंचे आक्षेपार्ह विधान.
24 ऑगस्ट
पहाटे 1.00
नाशिक सायबर पोलीस ठाण्यात राणेंवर गुन्हा दाखल. महाड, पुण्यातही गुन्हे दाखल.
सकाळी 5.00
नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचे राणेंना अटक करण्याचे आदेश.
सकाळी 7.00
नाशिक पोलिसांचे पथक राणेंना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने.
सकाळी 9.15
चिपळूणमध्ये राणेंची पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगत माध्यमांच्या प्रतिनिधींनाच धमकी.
सकाळी 11.00
अटकेची कारवाई टाळण्यासाठी रत्नागिरी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न. अटकपूर्व जामीन फेटाळला.
दुपारी 2.00
मुंबई उच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी धाव, पण दिलासा नाही.
दुपारी 2.15
संगमेश्करच्या गोळकली गाकात राणे ज्या ठिकाणी थांबले होते तिथे पोलीस आले. पोलिसांनी राणेंना कागदपत्रं दाखकली आणि पोलीस कारवाईस सहकार्य करण्यास सांगितले.
दुपारी 3.30
संगमेश्वर पोलिसांच्या उपस्थितीत राणेंची वैद्यकीय तपासणी. केंद्रीय मंत्री असल्याने राज शिष्टाचारानुसार सर्क सोपस्कार पार पाडत पोलिसांनी सका तासाने राणेंना अटक केली.
सायंकाळी 6.00
राणेंचा ताबा महाड पोलिसांकडे. महाड कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस राणेंना घेऊन रवाना.
रात्री 9.45
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी नारायण राणे यांना महाड कोर्टात हजर केले.
ही आहे नारायण राणे यांची महाड ते महाड यात्रा.































































