
पश्चिम बंगालमधील 2016 सालच्या नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकीम आणि सुब्रत मुखर्जी यांच्यासह चारजणांना अटक केल्यामुळे गोंधळ उडाला. यामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सीबीआय कार्यालयात धडक दिली आणि ‘येथून मी हटणार नाही. हवं तर मला अटक करा’, असा आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवामुळे तपास यंत्रणांना हाताशी धरून सुडाने कारवाई केली जात आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला असून, दगडफेक, रास्ता रोको करण्यात आला.
मलाही अटक करा; येथून हटणार नाही – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सकाळी 11 वाजता निझाम पॅलेस येथील सीबीआय कार्यालय गाठले. या कार्यालयाच्या 15व्या मजल्यावर तृणमूल मंत्र्यांना ठेवण्यात आले होते. तेथे ममता बॅनर्जी यांनी ठाण मांडले. ‘मी येथून हटणार नाही; हवे तर मला अटक करा’, असे ममता बॅनर्जी यांनी सीबीआय अधिकाऱयांना सुनावले.
मंत्री फिरहाद हाकीम आणि सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, माजी मंत्री सोवन चॅटर्जी यांना सायंकाळी सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर विशेष न्यायाधीश अनुपम मुखर्जी यांनी या चारहीजणांचा जामीन मंजूर केला.
प्रचंड तणाव
सीबीआय कार्यालयाबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. रास्ता रोको करीत दगडफेक करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. सीबीआयच्या कारवाईनंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हुगळी, नॉर्थ 24-परगणा, साऊथ 24-परगणा आदी ठिकाणी रास्ता रोको करीत टायर जाळण्यात आले.
राज्यपालांनी दिली सीबीआयला परवानगी
सीबीआयने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे नारदा स्टिंग प्रकरणात फिरहाद हाकीम, सुब्रत मुखर्जी यांच्यासह चारजणांवर खटला चालविण्याची परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यपालांनी ही परवानगी दिली. यामुळे या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.



























































