
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेशातील कांग्डा आणि अन्य भागांत जाऊन पूरग्रस्तांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी पूरग्रस्त कुल्लू, मंडी, कांगडा भागाची हवाई पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी हिमाचल प्रदेशला 1500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलनासारख्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमी झालेल्या व्यक्तीला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे जवळपास 4 हजार 122 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.