सत्तेच्या नशेत ममता बॅनर्जी लोकशाहीचा गळा घोटत आहेत

सामना ऑनलाईन । कोलकाता

भाजपच्या वाढत्या जनाधाराने सत्ता गमावण्याची भीती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना वाटू लागली आहे. त्यातूनच त्यांचे संतुलन बिघडले आहे. सत्तेच्या नशेत असलेल्या ममता बॅनर्जी लोकशाहीचा गळा घोटत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाशीरहाट येथे झालेल्या जाहीर सभेत केली.

लोकसभा निकडणुकीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील तणाव वाढला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. दहशतीच्या जोरावर आपण सत्ता भोगत राहू असे दीदींना वाटत असेल तर ते त्यांनी आता विसरायला हवे. ज्या पश्चिम बंगालच्या जनतेने तुम्हाला सत्ता दाखवली ती जनताच तुम्हाला सत्तेतून खाली खेचणार आहे आणि ती वेळ आता दूर नाही असे ते म्हणाले.

सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या फोटोतील व्यंग ममतांना सहन झाले नाही. एक चित्रकार असूनही त्यांनी बंगालच्या कन्येला जेलमध्ये धाडले. तुम्ही तर चित्रकार आहात, मग इतका राग कशासाठी, असा प्रश्न त्यांनी केला. तुम्ही माझे वाईटात वाईट चित्र काढा आणि 23 मेनंतर मी पुन्हा पंतप्रधान होईन तेव्हा ते मला भेट द्या. मी आदराने त्याचा स्वीकार करेन आणि आयुष्यभर ते चित्र जपून ठेवेन. कुठेही एफआयआर नोंदवणार नाही असा टोला मोदी यांनी लगावला.

कश्मीरमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान 30 हजार लोक बाहेर पडले होते. त्यावेळीसुद्धा एवढी हिंसा झाली नाही त्यापेक्षा जास्त हिंसा प. बंगालमधील निवडणुकीत पाहायला मिळाली. निवडणुकीदरम्यान अनेक माणसे मारली गेली. अनेकांची घरे त्यांच्या डोळ्यांदेखत जाळली गेली. त्यामुळे त्यांना बाजूच्या झारखंड आणि इतर राज्यांत पळून जावे लागले. त्यांची चूक एकढीच होती की ते निकडणुका जिंकत होते असे सांगत मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

देशापुढील समस्या वाढणार
लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आणि स्वत:ला पक्षीय राजकारणापासून अलिप्त समजणारेही बंगालच्या हिंसाचाराबद्दल काही बोलत नाहीत हे जास्त चिंताजनक आहे. कारण काहींचा पूर्ण कार्यकाळ मोदींच्या विरोधात द्वेष पसरवण्यात गेला. भाजपला विरोध करण्याच्या नादात ते बाकी सगळे माफ करताहेत. यामुळे देशापुढच्या समस्या वाढणार आहेत, असे ते म्हणाले.