नरेंद्र मोदी 75 वर्षांतील सर्वात अपयशी पंतप्रधान, काँग्रेसचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नरेंद्र मोदी हे हिंदुस्थानचे 75 वर्षांतील सगळ्यात अपयशी व कर्तृत्वशून्य सरकारचे पंतप्रधान आहेत. आठ वर्षांच्या कारकीर्दीत बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, महागाई, 84 टक्के लोकांचे घटलेले उत्पन्न, चीनचे संकट आदी मुद्दय़ांवर त्यांच्याकडे उत्तर नसल्याने ते अपयशाचे खापर दुसऱयावर फोडण्याचा आटापिटा करत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना सचिन सावंत म्हणाले, मोदींनी कोणत्याही मंत्रालयाशी चर्चा न करता लॉकडाऊन जाहीर केला हे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. जर राज्यांमुळे लॉकडाऊन केला होता तर 21 दिवसांत कोरोनावर मात करू हे मोदी का म्हणाले? त्यानंतर लॉकडाऊन कालावधी अनेकदा का वाढविला? टाळ्या, थाळ्या व घंटा का वाजवायला लावल्या? महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनने मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवल्याने कोरोना पसरला हा त्यांचा दावाही तेवढाच हास्यास्पद व खोटा आहे. पहिली श्रमिक ट्रेन 1 मे रोजी सुरू झाली. म्हणजे 38 दिवसांनंतर गुजरातमधून 1027 ट्रेन निघाल्या व 15 लाख स्थलांतरित मजूर त्यांच्या त्यांच्या घरी परत पाठवले तर दुसरीकडे महाराष्ट्रातून 844 ट्रेनमधून 12 लाख मजूर त्यांच्या घरी परतले. गुजरातमधून देशातील सर्वात जास्त ट्रेन सोडल्या व सर्वात जास्त मजूर घरी गेले मग कोरोना गुजरातमधून जास्त पसरला पाहिजे होता, महाराष्ट्रातूनच कसा पसरला? आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मजुरांना थांबवले पाहिजे होते असे भाजप म्हणत असेल तर मोदींनी गुजरातमधील मजुरांना का नाही थांबवले, असा सवाल सचिन सावंत यांनी केला.