
सामना ऑनलाईन, भोपाळ
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता जोरात सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दोन्ही राज्यांमध्ये आज सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये मोदींनी गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली. काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी 5 वर्षांसाठी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवावे. काँग्रेसने मोदींवर केलेल्या टीकेला उत्तर देत असताना मोदींनी हे आव्हान दिलं आहे. पंडित नेहरूंच्या दूरदर्शी धोरणामुळेच एक चहावाला आज देशाचा पंतप्रधान होऊ शकला. नेहरूंनी संस्था एवढय़ा मजबूत बनवल्या की सर्वसामान्य माणूसही देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याचे स्वप्न बघू शकतो अशी टीका काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली होती.
थरूर यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मोदी म्हणाले की काँग्रेसवाले अजूनही चहावाला कसा काय पंतप्रधान झाला म्हणून अश्रू ढाळत असतात. जोपर्यंत तुम्हाला लोकशाही कळणार नाही तोपर्यंत तुम्ही चहावाल्याला शिव्या देत रहाल. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे जर चहावाल पंतप्रधान बनू शकतो तर मग एकदातरी पाच वर्षांसाठी तुम्ही आपल्या कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसचा अध्यक्ष बनवून दाखवा.



























































