
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणार असल्याच्या आपल्या जुन्याच जुमलेबाजीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने फोडणी दिली. देशातील ६०० हून अधिक जिल्हय़ांतील शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादात त्यांनी आपल्या लोकसभा निवडणूक प्रचारातील या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही शेतीवरील बजेट दुपटीने वाढवून २.१२ लाख कोटी रुपये केल्याचेही मोदींनी म्हटले आहे.
मोदी म्हणाले, शेती क्षेत्राचे उत्पन्न वाढावे म्हणून सरकारी धोरणात चार महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. उत्पादन खर्चात कपात, शेतमालाला रास्त भाव, मालाची नासाडी रोखणे आणि उत्पन्नाचे पर्यायी स्रोत उपलब्ध करून देणे अशा चार पातळय़ांवर काम होत आहे.
यंदाच्या म्हणजे २०१८-१९च्या अर्थसंकल्पात उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. शेतकऱयांना हवी ती मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशातील कष्टकरी शेतकऱ्यांवर आमचा विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले.


























































