नासाचे हेलिकॉप्टर आज मंगळावर उडण्याची शक्यता

मंगळ ग्रहावर सर्व काही ठीकठाक राहिलं तर नासाचे इंजेन्युटी हेलिकॉप्टर सोमवारी उड्डाण घेऊ शकते. सध्या हे हेलिकॉप्टर मंगळावर असलेल्या प्रचंड थंडीला तोंड देत आहे. जर ठरल्याप्रमाणे झालं तर उद्याच ही ऐतिहासिक घटना घडू शकते. पृथ्वीच्या बाहेर पहिल्यांदा हे उड्डाण होणार आहे. त्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. याआधी 11 एप्रिल रोजी नासाचे हेलिकॉप्टर मंगळावरील वातावरणात उडणार होते, मात्र तांत्रिकी कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले.

नासाच्या म्हणण्यानुसार मंगळावर उद्या हेलिकॉप्टरचे उड्डाण यशस्वी झाले की नाही याची माहिती लगेच मिळणार नाही. यासंबंधीचा डेटा कॅलिफोर्नियाच्या टीमला मिळेल. मात्र नासाच्या वेबसाईटवर उड्डाण लाइव्ह बघता येईल. 16 एप्रिल रोजी इंजेन्युटी हेलिकॉप्टरची रॅपिड स्पीन चाचणी उत्तीर्ण झाली आहे. त्यानंतर आता हे हेलिकॉप्टर पृथ्वीवरून कोणतीही मदत न घेता उडणार आहे.

मंगळ ग्रहावर इंजेन्युटी हेलिकॉप्टर उडून काही अंतरावर फिरू शकले तर हे मिशन 90 टक्के यशस्वी झाले असे म्हणता येईल.

मंगळाचा पृष्ठभाग ओबडधोबड आहे. रोव्हरच्या मदतीने प्रत्येक भागात पोचणे शक्य नाही. म्हणूनच हेलिकॉप्टरची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या