इंधन तुटवड्यामुळे नाशिक जिल्ह्यात दोनशे पंप बंद, पुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा दावा कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे क्रूड ऑईल पुरवठ्यावर झालेला परिणाम, अचानक वाढलेली मागणी या कारणांमुळे पेट्रोल, डिझेल तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात 650पैकी 30 टक्के म्हणजेच सुमारे 200 पंप वेळेत इंधन न मिळाल्याने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. टंचाईजन्य परिस्थिती उद्भवेल म्हणून वाहनचालकांकडून इंधनाच्या मागणीत मोठी वाढ झाल्यानेही पंपांवरील साठा वेळेआधी संपत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सुमारे 650 पेट्रोलपंप आहेत, त्यापैकी नाशिक शहरात 125हून अधिक पंप आहेत. इंधन साठा शिल्लक नसल्याने सध्या 30 ते 35 टक्के पंप बंद राहत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक टंचाईची परिस्थिती भेडसावत आहे, पंपांवर रांगाच रांगा लागत आहेत. शहरातही काही पंपांवर इंधन शिल्लक नसल्याचे फलक लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे. क्रूड ऑईल महागल्याने सध्या इंधन कंपन्या तोटय़ात आहेत, त्याचबरोबर हा पुरवठाही युद्धजन्य परिस्थितीमुळे कमी झाला आहे. भविष्यातील गरज भागवण्यासाठी कंपन्यांनी सध्या पुरवठ्याबाबत हात आखडता घेतला असावा, असा तर्क मांडला जात आहे.

खरिपाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात इंधनाची मागणी वाढली आहे. त्यामुळेही पुरवठ्याचे गणित काहीसे कोलमडले आहे. टंचाई निर्माण होईल या भीतीने शहरी भागात अनेक जण गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी करीत आहेत. याआधी महिनाभरात एका पंपावर जेवढी विक्री व्हायची, ती सध्या एकाच आठवड्यात होत आहे, याचाही परिणाम पुरवठा साखळीवर झाला आहे. कंपन्यांना पंपधारक आरटीजीएसने पैसे देत आहेत, आगाऊ पैसे दिले जात आहेत, याचा तुटवड्याशी काही संबंध नाही, अशी माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनने दिली आहे.

पानेवाडीतील प्रकल्प शनिवारीरविवारी सुरूच

पानेवाडी येथील इंधन कंपन्यांच्या प्रकल्पांवरून याआधी शनिवारी-रविवारी पुरवठा बंद ठेवलेला असायचा, यामुळे गुरुवारपासून सोमवार दुपारपर्यंत अनेक भागांत इंधन टंचाई जाणवत होती. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत संबंधित कंपन्यांना शनिवार आणि रविवारीही पुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश दिले, त्याची अंमलबजावणी झाली आहे. जिल्ह्यात सगळीकडे पुरवठा सुरळीतच आहे, टंचाई कुठेही नाही, असा दावा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी केला आहे.