बेरोजगारीमुळे बनावट नोटांची छपाई; टोळीतील मुख्य संशयिताला कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठ दिवसांपूर्वी बनावट नोटा चलनात आणताना दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर आता या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सुरगाणा पोलिसांना यश आले आहे. रविवारी रात्री प्रिंटिंग प्रेस चालवणाऱ्या मुख्य संशयितासह चौघांना ताब्यात घेण्यात आले. मुख्य संशयितासह दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी तर इतर दोघांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. वर्षभरापासून काम नसल्याने या टोळीने बनावट नोटांची छपाई सुरू केल्याचे तपासात समोर आले आहे. यात आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली आहे.

सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण बाजारात 6 सप्टेंबरला बनावट नोटा देऊन दहा, वीस रुपयांच्या वस्तू खरेदी करणाऱया दोघांना ग्रामस्थांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. येवला येथील बांधकाम व्यावसायिक हरिष गुजर (29) व चिचोडी खुर्दचा बाळासाहेब सैद (38) अशी त्यांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे व पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.

दोघांकडून मिळालेल्या माहितीवरून आणखी नावे समोर आली. येवल्यातूनच अक्षय राजपूतला ताब्यात घेतले असता मुख्य संशयिताच्या नावाची उकल झाली. त्या किरण गिरमे (45)ला विंचूरहून रविवारी रात्री अटक केली. वर्षभरापासून काम नसल्याने येवल्याच्या प्रकाश पिंपळे (31), चांदवडचा राहुल बडोदे (27) व आनंदा कुंभार्डे (35) यांच्यासह हे कृत्य केले.