
निफाडजवळील कुंदेवाडी येथे सोमवारी या हंगामातील नीचांकी 11.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले, तर नाशिक व परिसरात एकाच दिवसात तापमान 14 वरून 15 अंशांवर पोहचले होते. दरम्यान, पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.
कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात एकाच दिवसात किमान तापमानात तब्बल 7 अंशांनी घट झाली. येथे रविवारी 18.2, तर आज 11.5 तापमान होते. नाशिक येथे रविवारी 14.2, तर सोमवारी 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात याआधी 30 ऑक्टोबरला किमान तापमान सर्वात कमी म्हणजे 12.8 इतके होते. दरम्यान, कुंदेवाडीचे सोमवारचे तापमान 11.5 हे या हंगामातील जिल्ह्यातील नीचांकी तापमान आहे. मालेगावला आज 14.6 तापमान होते. कमाल तापमान सध्या 30 ते 33 अंशांदरम्यान कायम आहे.
सोमवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र, 2 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत ढगाळ हवामान राहील. त्यामुळे शहरात किमान तापमान 16 ते 17, तर कमाल 31 ते 32 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.




























































