चारित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालायला लावला, नाशिक येथील भीषण घटना

चारित्र्य तपासण्यासाठी एका महिलेला उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयांचे नाणे काढायला सांगितल्याचा, असा अजब न्यायनिवाडा नाशिक येथील पारधी समाजातील जात पंचायतीने दिला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

एकीकडे माणूस चंद्र-मंगळावर स्वारी केली असताना आजही काही ठिकाणी लोक अघोरी प्रकारांना बळी पडत आहेत. नाशिकमध्ये असाच एक अघोरी प्रकारचा व्हिडीओ समोर आला आहे. एका महिलेला आपले चारित्र्य सिद्ध करण्यासाठी जीवघेणी परीक्षा द्यावी लागत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. नाशिकमध्ये राहत असलेल्या एका इसमाला आपल्या बायकोच्या चारित्र्यावर संशय होता. यातून त्यांच्यात बरेच वाद होऊ लागले. त्यामुळे हे प्रकरण जात पंचायतीपर्यंत पोहोचलं.

नवरा-बायकोचा या भांडण सोडवण्यासाठी पारधी समाजातील जात पंचायतीने अजब न्यायनिवाडा केलाय. या पंचायतीने महिलेचे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी तिला उकळत्या तेलात हात घालायला लावला. पंचायतीने 5 रुपयांचे नाणे उकळत्या तेलातून काढण्याची परीक्षा घेतली. त्यासाठी तीन दगडांची चूल मांडली. कढई ठेवून त्यामध्ये तेल ओतून उकळ काढली. उकळत्या तेलात 5 रुपयांचे नाणंही टाकलं. नंतर तिला उकळत्या तेलातून नाणं बाहेर काढण्यासाठी सांगितले. घाबरलेल्या महिलेने अनेकदा विरोध करूनही तिला ही अघोरी परीक्षा द्यायला लावण्यात आली.

जात पंचायत आणि पतीने तिच्यावर प्रचंड दबाव घातला. अखेर तिने घाबरत उकळत्या तेलात हात घालून 5 रुपयाचं नाणं बाहेर काढलं. तिचा हात भाजला. या महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध, असा अजब न्याय पंचायतीनं लावला होता. यापेक्षा क्रुरता म्हणजे महिलेच्या नवऱ्याने व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या घटनेची चौकशी होऊन जात पंचायत विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या