चित्रकाराचा मास्टर स्ट्रोक! पदार्पणातच राज मोरे यांनी राष्ट्रीय पुरस्कार घातला ‘खिसा’त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक ख्यातीचे चित्रकार राज मोरे यांचा मास्टर स्ट्रोक नुकताच 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत पाहायला मिळाला आहे. त्यांच्या ‘खिसा’ या लघुपटाला नॉन फिक्शन श्रेणीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणासाठी पुरस्कार मिळाला आहे. बंद स्टुडिओतून बाहेर पडून मला माझा कॅनव्हास विस्तारायचा होता. ते स्वप्न काहीसं पूर्ण झाल्यासारखे वाटतंय. ‘खिसा’चे यश हे संपूर्ण टीमचे यश असून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने माझ्यावरची जबाबदारी आणखी वाढलीय, असे राज मोरे यांनी सांगितले.

अकोला येथील चित्रकार राज मोरे यांनी जे. जे. कॉलेज ऑफ आर्टस्मधून व्हिज्युअल फाईन आर्टचे धडे गिरवले आहेत. मात्र फिल्म मेकिंगबद्दल त्यांना जास्त आकर्षण होते. याबाबत दैनिक ‘सामना’शी बोलताना ते म्हणाले, चित्रपटाच्या आवडीपोटी मी एफटीआयला प्रवेशासाठी अर्ज केला. तिथे प्रवेश मिळाला नाही. फाईन आर्टमध्येही मी जे काही करत होतो ते अफलातूनच होतं. 2012 साली मला ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर बेस्ट एशियन आर्टिस्ट म्हणूनही गौरव झाला. चित्रकार ते दिग्दर्शक या प्रवासाविषयी ते म्हणाले, फाईन आर्टमधील माझ्या कामाला पसंती मिळत होती. पण बंद स्टुडिओतून बाहेर पडून मला माझा कॅनव्हास विस्तारायचा होता. चित्रकला आणि चित्रपट ही माध्यम वेगळी असली तरी त्यात कनेक्शन आहे. एखादा विषय कॅनव्हासवर चितारण्याचा प्रकार मला सिनेमातली गोष्ट सांगण्यासारखाच वाटतो.

khisaलघुपटात दडलंय काय?

कैलास वाघमारे लिखित ‘खिसा’ या लघुपट खेडेगावातील संकुचित दृष्टिकोनावर भाष्य करणारा आहे. कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड आणि वेदांत श्रीसागर यात मुख्य भूमिकेत आहे. लघुपटात खेडेगावातील शाळेत चौथीत शिकणाऱया मुलाची गोष्ट आहे. या लघुपटाच्या कथेविषयी राज म्हणाले, लहान मुले निरागस असतात. आपणच त्यांना जात-धर्माच्या बंधनात अडकवतो. समाजात असे काही लोक आहेत जे महापुरुषांच्या नावाखाली भांडवल करतात. त्याला तो निरागस मुलगा कसा बळी पडतो हे जळजळीत वास्तव यात मांडलंय. हेच ‘खिसा’च्या यशाचे गमक आहे. लॉकडाऊनमध्ये मी एका चित्रपटाची कथा लिहिली असून भविष्यात आशयघन चित्रपट प्रेक्षकांसमोर मांडणार असल्याचे ते म्हणाले.