‘नीट’ परीक्षेवेळी सांगलीत संतापजनक प्रकार विद्यार्थी-विद्यार्थिनींना कपडे उलटे घालायला लावले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे (एनटीए) घेतल्या गेलेल्या ‘नीट’ परीक्षेसाठी सांगलीतील एका परीक्षा केंद्रावर  विद्यार्थी–विद्यार्थिनींना घातलेले कपडे काढायला लावून ते ‘उलटे घालणे’ बंधनकारक करण्यात आल्याचा प्रकार घडला. ज्या केंद्रावर परीक्षा घेण्यात आली त्या महाविद्यालयाने या परीक्षेसाठी आम्ही केवळ केंद्र उपलब्ध करून दिले असून, सदर परीक्षा ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ च्या माध्यमातून घेण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, पालकांनी ई–मेलच्या माध्यमातून थेट राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे तक्रारी केल्या आहेत. काही सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी याबाबत प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.

देशभरात रविवार (दि. 7) वैद्यकीय प्रवेशाकरिता आवश्यक असणारी ‘नीट’ परीक्षा पार पडली. सांगली शहरातील काही केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत कोणी कॉपी करू नये, यासाठी परीक्षेचे आयोजन करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी दक्ष होती. परंतु एजन्सीच्या कर्मचाऱयांनी शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देताना तपासणीच्या नावाखाली कपडे काढून ते उलटे परिधान करायला भाग पाडले. भविष्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा देणे महत्त्वाचे असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उलटे कपडे घालून परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर जेव्हा मुले बाहेर आली, तेव्हा पालकांनी उलटे कपडे घातल्याबद्दल विचारणा केली असता, हा प्रकार निदर्शनास आला.

दरम्यान, जिह्यातील अन्य केंद्रांवर असा प्रकार आढळला नाही. प्रत्येक ठिकाणी केवळ एनटीएच्या सूचनेप्रमाणे ड्रेस कोड आहे की नाही, इतकीच तपासणी केली गेली. एकाच केंद्रात वेगळा नियम का लावला गेला, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

राज्य महिला आयोगाकडून दखल

सांगलीतील एका परीक्षा केंद्रावर झालेल्या या प्रकाराची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागास चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यभरात असे आणखी काही प्रकार घडले आहेत का, याची चौकशी करून दोन दिवसांत त्याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेलाही त्यांनी पत्र देऊन याप्रकरणी चौकशी करण्याची सूचना केली आहे.