
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामामधील अवंतीपुरा येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने केलेल्या हल्ल्यामध्ये हिंदुस्थानचे 40 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर हिंदुस्थानच्या वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील जैशच्या तळांवर हवाई हल्ला केला होता. हिंदुस्थानने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे जैशचे कंबरडे मोडले होते. परंतु यानंतर पाकिस्तानने देखील हिंदुस्थानवर एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते यामध्ये फसले होते.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या वायुसेनेने 20 अमेरिकन बनावटीचे एफ 16 लढाऊ विमान, फ्रान्स बनावटीचे मिराज-3 आणि चीनच्या जेएफ-17 लढाऊ विमानांच्या सहाय्याने हिंदुस्थानवर हजारो किलोंचा हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हिंदुस्थानच्या सजग वायुसेनेने पाकड्यांचा हा मनसुबा उधळवून लावला. पळकुट्या पाकिस्तानने जाताजाता सीमारेषेपासून 50 किलोमिटर आत एक हजार किलोचा 11 एच-4 हा बॉम्ब तीन ठिकाणी टाकला, परंतु त्यांचा निशाणा चुकला. पाकिस्तानने मिराज-3 या विमानांच्या सहाय्याने हा बॉम्ब टाकला होता.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने टाकलेला बॉम्ब लक्ष्याचा वेध घेऊ शकला नाही. कारण हिंदुस्थानी वायुसेनेने पाकिस्तानच्या विमानांना हुसकावून लावले आणि त्यांची भंबेरी उडाली. याच दरम्यान त्यांनी बॉम्ब टाकला आणि त्याचा निशाणा चुकला. तसेच ज्या भागात हा बॉम्ब टाकले तेथे गर्द झाडी असल्याने नुकसान झाले नाही, असे सूत्रांना सांगितले.




























































